सांगली - मी कोणत्याही चौकशीला तयार आहे असे आव्हान देत, जे गुन्हे लपवतात त्यांची माहिती न्यायालयात गेल्याशिवाय कळत नाही. ज्यांचा काही संबंध नसतो त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दडपशाहीने आवाज बंद करू शकतो हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्र्यांबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने गुन्हे लपवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असेही पवार म्हणाले.
सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर पार पडलेल्या सभेत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी राजू शेट्टी, जयंतराव पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
हेही वाचा - जोरदार शक्तिप्रदर्शनाने राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
या सभेत शरद पवार यांनीही बोलताना भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तर जयंत पाटील यांच्या निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले, अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेला जनसमुदाय पाहता इस्लामपूर मतदारसंघातील निकाल लागला आहे. या ठिकाणी प्रचाराची गरज नाही, तसेच ही निवडणूक राज्यातील तरुणांनी हातात घेतली आहे. त्यामुळे बदल नक्की घडेल, असा विश्वास व्यक्त केला. तर सरकारच्या धोरणावर टीका करताना आज शेती मालाच्या किमतीबद्दल सरकारला आस्था नाही. कांद्याचे भाव वाढले तर मोदी सरकारने कांदा बाहेर जाऊ न देण्याच निर्णय घेतला. कांद्याचे दर वाढले की कांदा निर्यात बंदी का करता? शेतकऱ्यांना जादा पैसे मिळण्याचे मार्ग बंद केले जातात, असा आरोप करत दर वाढल्यामुळे सामान्य माणसाच्या संसाराला कांद्याने अडचण येत नाही, असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा - 'पवार यांच्यावरील ईडी कारवाई म्हणजे बदनामीचा भाजपचा कुटील डाव'
मुख्यमंत्री यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गुन्हा दाखल करण्याच्या आदेशावर बोलताना पवार म्हणाले, गत पंचवार्षिक निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना गुन्ह्यांची माहिती लपवली होती. त्यावर दाखल झालेल्या एका याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने आज मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जे गुन्हे लपवतात त्यांची माहिती न्यायालयातून मिळते आणि ज्यांचा काही संबंध नसतो त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दडपशाहीने आवाज बंद करू शकतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. पण, याला कोणी भीक घालणार नाही. अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
हेही वाचा - EXCLUSIVE: 'वंचित'चा आणखी एक मोहरा गळाला, गोपीचंद पडळकर लवकरच स्वगृही?
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. त्यामध्ये माझे आणि अजित पवारांचे नाव पुढे आले. मात्र, माझा या संचालक मंडळाशी कसलाही संबंध नाही. तसेच या 70 संचालक मंडळात आज भाजप-शिवसेना या नेत्यांचे समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई झाली, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच माझी काय चौकशी करायची आहे ती करा, मी कसल्याही चौकशीला तयार आहे, असा इशारा भाजपा सरकारला दिला. हे सरकार सत्तेचा गैरवापर करून दडपशाही करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवारांनी यावेळी केला आहे.