सांगली - सांगली ही पुणे पदवीधर निवडणुकीच्या रणसंग्रामाची रणभूमी बनली आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दलाकडून सांगली जिल्ह्यातील उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे पदवीधर निवडणुकीचे केंद्रबिंदू आता सांगली राहणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन निवडणुकीमध्ये पुणे पदवीधरच्या निवडणुकीत भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली होती. मात्र, गेल्या वर्षी पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी आता निवडणूक होत आहे.
एकाच जिल्ह्यातील 3 उमेदवार-
भाजपाकडून यंदा पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये कडेगाव तालुक्याचे भाजपाचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व माजी आमदार संपतराव देशमुख यांचे पुत्र संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवार देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पलूस तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड यांचे पुत्र अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हे सुद्धा जनता दलाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
सांगली ठरणार पदवीधर निवडणुकीची रणभूमी-
भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल या तिन्ही पक्षांनी यंदा सांगली जिल्ह्यात पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अशी काट्याची लढत झाली होती. या निवडणुकीत अरुण लाड यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. यामुळे राष्ट्रवादीला फटका बसत कोल्हापूरचे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना फायदा होऊन ते दुसऱ्यांदा विजयी झाले होते. तर यंदा भाजपाने कडेगावच्या संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने मागील वेळी डावलेल्या अरुण लाड यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे यंदा भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत राहणार आहे. तसेच जनता दलाचेही माजी आमदार शरद पाटलांची उमेदवारीही महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे पुणे पदवीधर निवडणुकीचे केंद्रबिंदू आणि रणभूमी सांगली असणार आहे.
जिंको कोणीही, सांगलीला मिळणार आणखी एक आमदार-
एकाच जिल्ह्यात प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी अशी टक्कर होणार असली, तरी जनता दलाचे शरद पाटील यांचे सुद्धा आव्हान असणार आहे. संग्राम देशमुख आणि अरुण लाड हे एकाच मतदार संघातील आहेत. शिवाय दोन्ही नेते कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षात सध्या असले तरी दोन्ही कुटुंबात स्नेहसंबंध चांगले आहेत. असे असले तरी आता देशमुख आणि लाड यांच्यात थेट लढत असणार आहे. त्याचबरोबर शरद पाटील हे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे सांगलीच्या तिन्ही उमेदवारांमध्ये ही निवडणूक रंगणार असून कोणत्याही पक्षाचा उमेदवार विजयी झाला, तरी सांगली जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळणार हे निश्चित आहे.
हेही वाचा- पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ; पोलीस यंत्रणेने खानावळीवाल्याचे थकवले बिल