सांगली - कृष्णा नदीला आलेला महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त आता आपआपल्या घरी परतत आहेत. घराची सफाई करत असताना घरातील भिजलेले टाकाऊ साहित्य आणि कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. मात्र, हा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने संतप्त पूरग्रस्तांनी नांद्रे-सांगली मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पूरग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कर्नाळ रोडवरील साईनाथ नगरमध्ये शेकडो पूरग्रस्त आपल्या घराची सफाई करत आहेत. या ठिकाणी अद्याप कोणताही अधिकारी किंवा नगरसेवक किंवा फिरकले नाही. त्यामुळे, या भागातील पूरग्रस्तांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. आज नागरिकांनी तब्बल एक तास नांद्रे-सांगली मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
कचरा उठाव होत नसल्याने, या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच शासनाची मदतही अद्याप पोहोचली नसल्याचा आरोप पूरग्रस्तांना यावेळी केला आहे.