सांगली - मुंबईवरून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला. या रुग्णावर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली. सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या चार झाली आहे.
ही ४० वर्षीय व्यक्ती मुंबईतील मानखुर्दमध्ये भाजीपाला विक्री व्यवसाय करत होती. तो सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील रहिवासी आहे. २७ एप्रिलला मुंबईमधून सोलापूरमार्गे एका वाहतुकीच्या गाडीतून कवठेमहांकाळमधील दुधेभावी या आपल्या मामाच्या गावी पोहचला आला होता. बुधवारी जिल्हा परिषदेच्या फिवर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आली असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. या तपासणीमध्ये या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे वाटल्याने याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना दिली.
त्यानंतर या व्यक्तीला बुधवारी मिरजेच्या कोरोना रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करुन कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. कोरोना चाचणीचा रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर प्रशासनाने वेगात हालचाली करत कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले. तर काहींना कवठेमहांकाळ येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे. दुधेभावी हे गाव सील करण्यात येत आहे.