सांगली - महापौर निवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर प्रचंड गर्दी केली होती. कोरोनाची परिस्थितीवर प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू असताना राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महापौरांची निवडीच्या निमित्ताने नियमांच्या उल्लंघन केल्याचे दिस आहे. असे असताना पोलीस यावर कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे.
आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांवर कारवाई होणार का?
राज्यात कोरोनाचा रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कोरोना नियमांची अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यात सभा, जत्रा, यात्रा, रॅली यावर बंदी घालण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील प्रशासनाकडून उत्पादनाच्या बाबतीत धडक कारवाई सुरू आहे. महापालिका क्षेत्रात तर खुद्द महापालिकेचे आयुक्त रस्त्यावर उतरून मास्क आणि कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करत आहेत. तर दोन दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानमधील निलंबित करण्यात आलेल्या नितीन चौगुले यांनी शिवभक्तांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्या दरम्यान गर्दी जमवल्याप्रकरणी नितीन चौगुले यांच्यासह 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा - 'पोहरादेवी येथे नियमांचा भंग झाला, कारवाई होणारच'
असे असताना मंगळवारी सांगली महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर प्रचंड गर्दी केली. कार्यकर्त्यांनी यावेळी मोटर सायकल रॅली काढत फटाक्यांची आतिषबाजी केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या समोर आणि सांगली महापालिका कार्यालयाच्या आवारात घडला. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांवर कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई होणार का? असा सवाल भाजपचे मिरज शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर यांनी उपस्थित केला आहे.
चौकशी करून कारवाई -
दरम्यान, याबाबत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना विचारले असता, जिल्ह्यामध्ये कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे या निवडीच्या वेळी जर असा प्रकार झाला असेल, तर त्याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.