सांगली - डॉक्टरांचे नव्हे तर गेल्या 3 महिन्यातील पालकमंत्री जयंत पाटलांच्या कामाचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी करत जयंत पाटील म्हणजे आंधळा अन् बहिरा राजा असल्याची टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदरावरून मंत्री पाटील यांनी डॉक्टर प्रोसिजरच्या ऑडिटची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. यावरून आमदार पडळकर यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला, ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
आटपाडी तालुक्यातल्या ग्रामीण कोरोना रुग्णालयामध्ये डॉक्टरांना विना पीपीई किट घालून काम करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे काही मोजक्या डॉक्टरांमुळे कोरोना लढ्यात काम करणाऱ्या चांगल्या डॉक्टरांचे खच्चीकरण करणे योग्य नाही, याउलट जयंत पाटलांनी जिल्हा आणि तालुका स्तरीय बैठका घेतल्या आणि त्या ठिकाणी तिथल्या आरोग्य यंत्रणेला मोठी-मोठी आश्वासने दिली. मात्र त्याचं काही झालं नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या ऑडिट पूर्वी पालकमंत्री म्हणून गेल्या 3 महिन्यातील जयंत पाटलांचा कामांचं ऑडिट झाले पाहिजे, इतकेच नव्हे तर गेल्या ३० वर्षांपासून पाटील मोठ्या मोठ्या पदांवर राहिले आहेत, आताही सत्तेत आहेत. त्यामुळे गेल्या तीस वर्षात जिल्ह्याला काय दिले, या सर्वांचेही ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे.
तसेच जयंत पाटील यांच्या सारखा माणूस पालकमंत्र्याच्या रूपाने राजा म्हणून जिल्ह्याला मिळाला, मात्र हा राजा आंधळा आणि बहिऱ्याच्या भूमिकेत नेहमी राहतो. म्हणजे काही गोष्टी दिसून न दिसल्या सारखे आणि ऐकून न ऐकल्यासारखे करायचे, असा हा राजा आहे, अशा शब्दात आमदार पडळकर यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.