सांगली - गांजाची तस्करी करणाऱ्यास एका तरुणास मिरज पोलिसांनी अटक केली असून, १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. चंद्रकांत माने असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कर्नाटकमधून गांजा विक्रीसाठी मिरजमध्ये आणला जात होता. सापळा रचून मिरज ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
मिरजेत काही दिवसांपूर्वी गांजा सेवन केल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. यामुळे मिरजमध्ये गांजा विक्री होत असल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर मिरज पोलिसांनी गांजा तस्करीबाबत सखोल तपास सुरू केला होता. आज मिरज ग्रामीण पोलिसांना शहरात गांजा विक्रीसाठी एकजण कर्नाटकमधून येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळली होती. त्यानुसार पोलिसांनी बेडग-विजयनगर या कर्नाटक सीमेनजीकच्या मार्गावर सापळा लावून चंद्रकांत मानेला ताब्यात घेऊन तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे एका पोत्यात गांजाच्या पुड्या आढळून आल्या. तब्बल १० किलो गांजा व १ मोटरसायकल असा ७२ हजारांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त करत माने याला अटक केली आहे.
सांगली-मिरजेत शेजारच्या कर्नाटकमधून गांजा आणून विक्री करण्यात येत असल्याचे या घटमेनुळे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आता या गांजा तस्करीच्या रॅकेटचा बिमोड करण्याच्या दृष्टीने मिरज पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे आणि मोठा अनर्थ टाळावा असे आवाहन मिरज पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांनी केले आहे.