सांगली - राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्यामुळे राज्यातील भाजपाने केंद्राकडून मदत आणावी, असा टोला कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी लगावला आहे. तसेच राज्यातील 45 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही यावेळी कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्र्यांनी आज सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्यातील शेती नुकसानाचा आढावा दिला आहे. राज्यात जवळपास 45 लाख हेक्टर शेतीचे सध्या नुकसान झाले आहे. 70 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित 30 टक्के पंचनामे येत्या काही दिवसात पूर्ण होतील. त्यामुळे नुकसान क्षेत्राचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व परिस्थितीमध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळेच दहा हजार कोटींची मदत सरकारने जाहीर केली आहे.
केंद्रातून मदत आणा -
राज्य सरकारच्या मदत देण्यावरून टीका करणाऱ्या राज्यातील भाजपावर निशाणा साधताना राज्य सरकारने आता मदत जाहीर केली आहे. त्यामुळे टीका करणाऱ्या राज्यातील भाजपाने केंद्रात असणाऱ्या त्यांच्या सरकारकडून मदतीची मागणी करून मदत आणावी, असा टोला कदम यांनी राज्यातील भाजपाला लगावला आहे. तसेच केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तातडीने एनडीआरएफ पथक पाठवावे, अशी मागणीही यावेळी कदम यांनी केली आहे.
बांधावर जाऊन पंचनामे करा -
सुमारे 22 हजार हेक्टर शेतीच्या नुकसानीचा अंदाज असून पंचनामे सुरू आहेत. येत्या तीन ते चार दिवसात संपूर्ण पंचनामे पूर्ण होतील. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करणे गरजेचे आहे आणि जे कोणी अधिकारी यामध्ये हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही विश्वजीत कदम यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादीवर निशाणा -
सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये होणारा प्रवेश यावर बोलताना विश्वजीत कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि अप्रत्यक्षरित्या जयंत पाटलांवर निशाणा साधला. राज्यात महाविकास आघाडी एकसंधपणे काम करत आहे. त्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मात्र, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली वैचारिक लढाई कोणासोबत आहे, याचे भान ठेवून काम करावे, असा टोला विश्वजीत कदम यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना लगावला आहे.