सांगली - कोरोनामुळे मनोबल खचलेल्यांसाठी सांगलीतील एका व्याख्यात्याकडून जगण्याचे धडे देण्यात येत आहेत. कोरोना सेंटरवर जाऊन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मनोबल वाढवून जगण्याची नवी उर्मी निर्माण करण्याचे काम वसंत हंकारे या अवलियाकडून सुरू आहे. का आहे हंकारे यांचा हा उपक्रम जाणून घेऊ या खास रिपोर्टमधून..
कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्याचा उपक्रम
कोरोनाने खर तर आज समाज मनावर खूप गंभीर स्वरूपाचे परिणाम केले आहेत. सर्वच पातळ्यांवर कोरोनाचे एक भयानक संकट आहे. त्याहीपेक्षा ज्या व्यक्तींना कोरोना होतो, त्या व्यक्ती आणि कुटुंबावर प्रचंड मानसिक दडपण येत आहे. अशा या मानसिकदृष्ट्या खचलेल्या कोरोना रुग्णांच्या मदतीला सांगलीतील कसबे डिग्रज येथील व्याख्याते वसंत हंकारे हे मनोबल वाढवण्यासाठी धावून जात आहेत. सांगली सह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटरमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांचे हास्ययोग, नृत्ययोग आणि स्वसंवाद या माध्यमातून मनोधैर्य वाढवण्याचे काम करत आहेत. वसंत हंकारे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेरणादायी व्याख्यान देण्याचा काम करत आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वच काही बंद असल्याने हंकारे यांची व्याख्याने सुध्दा थांबली. मात्र आपल्या या व्याख्यानाचा कोरोनाच्या परिस्थितीशी झुंजणाऱ्या रुग्णांना आधार देण्याचा निश्चय त्यांनी केला आणि थेट कोरोना सेंटरमध्ये जाऊन वसंत हंकारे यांनी कोरोना रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर मनोरंजनाच्या माध्यमातून मानसिक आधार देण्याचे काम सुरू केले आहे.
'कोरोना शरीरात कमी मनात अधिक'
याबाबत वसंत हंकारे म्हणाले, की आज अनेक जण कोरोनाबाधित होऊन विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. कोरोना हा रोग आज माणसाच्या शरीरात 10 ते 15 टक्के आहे. मात्र मनामध्ये तो 100% बिंबला आहे. मनातला हा शंभर टक्के कोरोना माणसाला मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणारा ठरत आहे. त्यामुळे अशा रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आपण प्रत्यक्ष जाऊन त्यांच्यामध्ये आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे. नृत्ययोगाच्या माध्यमातून त्यांना नाचवणे, हास्य योगाच्या माध्यमातून त्यांना हसवणे, त्याशिवाय त्यांचा जो इतरांशी संपलेला संवाद आहे, तो स्वतःशी निर्माण करून देण्याचा प्रयत्न आपण एक महिन्यापासून करत आहोत आणि याला कोरोना रुग्णांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या या कार्यामुळे रुग्णांमध्ये जगण्याची नवी उर्मी सुद्धा निर्माण होत असल्याचे हंकारे यांनी सांगितले आहे.
विना मोबदला सुरू आहे उपक्रम
सांगली जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक आणि कोल्हापूर याठिकाणी वसंत हंकारे हे कोरोना सेंटरमध्ये जाऊन कोरोना रुग्णांना जगण्याची नवी ऊर्जा देण्याचे काम करत आहेत. त्यांना कसबे डिग्रजचे जिल्हा परिषद सदस्य असणारे विशाल चौगुले यांच्या माध्यमातून त्यांचा हा उपक्रम विनामूल्य सुरू आहे. कोणत्याही प्रकारचे मानधन हंकारे घेत नाहीत.
मनातील भिती दूर करण्याचा प्रयत्न
एकंदरीत आज कोरोना रोगापेक्षा त्याची भिती प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. नेमके याच भीतीला दूर करून कोरोना रुग्णांमध्ये जगण्याची नवी ऊर्जा वसंत हंकारे यांच्याकडून निर्माण करण्याचा उपक्रम सुरु असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
हेही वाचा -6 हजार 500 'सेवा निवृत्त एसटी कर्मचारी संकटात; हक्काचे पैसे महामंडळाने थकविले