सांगली - खानापूर तालुक्यात बेकायदा वाळू साठ्यावर प्रशासनाने छापा टाकत ३५ ब्रास वाळू जप्त केली आहे. भिकवडी येथील एका शेतात हा वाळूसाठा केला होता. खटाव आणि खानापूर तहसीलदारांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत अवैध वाळू तस्करी उघडकीस आणली आहे.
खानापूर तालुक्यातील भिकवडी बुद्रुक येथील एका शेतात छापा टाकून तब्बल ३५ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. भिकवडी ओढ्यातील अवैध वाळू उपसा करुन त्या वाळूचा तेथीलच एका शेतकर्याच्या शेतात साठा चालू होता. याबाबतची अधिक माहिती खानापूर महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार रंजना उंबरहंडे यांच्या पथकाने भिकवडी येथे ओढा पात्रात पाहणी केली. त्यावेळी ओढ्यात वाळू उपसा केल्याने मोठे खड्डे पडल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांना शेजारच्या एका शेतात वाळूचा मोठा साठा असल्याचे दिसून आले. त्याचवेळी खटाव तहसीलदारांच्या पथकानेही तिथे छापा टाकला. यात खानापूर तहसीलदारांच्या पथकाने २७ ब्रास वाळू आणि खटाव तहसीलदारांच्या पथकाने ८ ब्रास असा एकूण ३५ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.