सांगली - एक-दोन नव्हे तर तब्बल 80 लाख रुपये किंमत आणि वजन दीड टन, हे कोणत्या गाडीची किंमत आणि वजन नसून ही आहे एका रेड्याची किंमत आणि
वजन.. ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल पण सांगलीच्या कृषी प्रदर्शनामध्ये "गजेंद्र" रेडा सध्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. या रेड्याचे वय चार वर्षे आहे.
दीड टनाचा गजेंद्र रेडा
सांगलीच्या तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा "गजेंद्र" नावाचा रेडा.. या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थ प्रदर्शनात भली मोठी गर्दी करत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मंगसुळी गावातील विलास नाईक यांचा हा"गजेंद्र" रेडा आहे. या "गजेंद्र"चा रोजचा खुराक म्हणजे त्याला दिवसाला 15 लिटर दूध, भरपूर ऊस, गवत आणि इतर खाद्य लागते.
80 लाखांना मागणी -
नाईक यांच्या घरच्या गीर म्हशींचा हा रेडा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी हजारो किलोमीटरवरून लोक येतात. सध्या सांगलीच्या तासगाव येथे शिवार प्रदर्शनात हा गजेंद्र रेडा आला आहे. खास आकर्षण ठरला आहे. या गजेंद्रला तब्बल 80 लाखाला मागणी सुद्धा आली होती. पण, मालकांनी घरची पैदास असल्याने गजेंद्रला विकले नाही. आतापर्यंत कर्नाटकसह चार प्रदर्शनात "गजेंद्र"ने सहभाग घेतला असून त्या सर्व ठिकाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.