सांगली - कृष्णा आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. तर शहरातील पूर पट्ट्यातील सखल भागातल्या 200 हुन अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर वारणा नदीला पूर आल्याने वारणा काठच्या काही गावांमध्येही पुराचे पाणी शिरले आहे.
पलूस तालुक्यातील भिलवडी,अंकलखोप यासह काही गावात पुराचे पाणी शिरले आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचशेहून अधिक कुटुंबांचे आणि 350 हुन अधिक जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळी वाढल्याने जिल्ह्यातील 25 रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे.
बचाव कार्यासाठी आर्मीला पाचारण
वाळवा तालुक्यातील शिरगाव याठिकाणी गावाला पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे शेकडो लोक अडकून आहेत. त्याठिकाणी एनडीआरएफच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. परिस्थिती गंभीर बनत असल्याने मदतकार्यासाठी आर्मीला देखील जिल्हा प्रशासनाकडून पाचारण करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत सैन्य दलाच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.