सांगली - कचरागाडीतून मृतदेह नेऊन एका तरुणावर जतमध्ये अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात राज्य मानवी हक्क आयोगाकडे सामजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी तक्रार दाखल केली आहे.
तीन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील जतमध्ये एका तरुणाचा मृतदेह चक्क नगरपालिकेच्या कचरागाडीतून नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला होता. सदर तरुण हा रायगडमधून आपल्या जत या गावी आला होता. त्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या तरुणाला त्रास होऊ लागल्याने जतमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना कमी रक्तामुळे त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, सोशल मीडियावर सदर तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे तरुणावर अंत्यसंस्कारासाठी कोणी पुढे आले नव्हते. नगरपालिकेने कचऱ्याच्या गाडीतून नेऊन सदर तरुणावर अंत्यसंस्कार केले.
तरुणाचा मृतदेह कचरा गाडीतून घेऊन जात असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ माजली होती. या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. याबाबत जतमधील सामजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी जत नगरपालिका प्रशासनाला दोष देत, जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत हाराळे यांच्या विरुद्ध राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. जत नगरपरिषदेने मृतदेह अॅम्ब्युलन्स, शववाहिका अथवा इतर वाहनातून घेऊन जाणे अपेक्षीत होते. पण जत नगरपरिषदेने चक्क कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीतून मृतदेह घेऊन जाऊन मृतदेहाची अहवेलना व हेळसांड केली आहे. तसेच माणुसकीला काळीमा फासून नगरपरिषद मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी मानवी हक्काचे उल्लंघन केल्याचा आरोप करत सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे ही तक्रार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत सखोल चौकशी करून दोषी मुख्याधिकारी यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.