सांगली - खतांच्या वाढलेल्या दराशी केंद्र सरकारचा कसलाही संबंध नसून खत कंपन्यांच्याकडून हे दर वाढवलेले आहेत, असे मत माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले आहे. लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रीय रसायन मंत्र्यांनी दिल्याचे स्पष्ट केले आहे. या खत दरवाढीवरून काही लोक जाणीवपूर्वकराजकीय हेतूने शेतकऱ्यांच्या मनामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात गैरसमज पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोपही आमदार खोत यांनी केला आहे, ते इस्लामपूर याठिकाणी बोलत होते.
'खत दरवाढीशी केंद्राचा संबंध नाही' -
आमदार खोत म्हणाले, खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे, तो साहजिकच आहे. मात्र, खतांचे दर केंद्र सरकारकडून वाढवण्यात आले नसून ते खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्याकडून वाढवण्यात आले आहेत. याची दखल केंद्र सरकारकडून घेण्यात आली असून खतांच्या किंमती स्थिर ठेवण्याबरोबर शेतकऱ्यांना योग्य भावात खत मिळाले पाहिजे, हे केंद्राचे धोरण आहे. या वाढलेल्या खतांच्या बाबतीत आपले आणि केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याशी चर्चा झाली असून केंद्र सरकारकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आज किंवा उद्या याबाबत निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे आश्वासन गौडा यांनी दिल्याचे खोत यांनी स्पष्ट केला आहे.
'राजकीय हेतून गैरसमज पसरवण्याचे काम' -
या वाढलेल्या खतांच्या दरावरून विरोधकांच्याकडून शेतकऱ्यांच्या मनामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे. जाणीवपूर्वक राजकीय हेतूने ते केले जात आहे, असा आरोपी आमदार खोत यांनी करत केंद्र सरकार शेतकरयांच्या बाजूचे असून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.