सांगली - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या प्राजक्ता कोरे या अध्यक्षा तर शिवाजी डोंगरे हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. सांगलीत महाविकास आघाडीला यश आलेले नाही. शिवसेना आणि मित्र पक्षांच्या मदतीने भाजपने जिल्हा परिषदेवर पुन्हा एकादा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार प्राजक्ता कोरे यांना 35 तर काँग्रेसच्या उमेदवार कलावती गौरगोड यांना 22 मते मिळाली आहेत. तसेच उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शिवाजी डोंगरे यांना 35 तर काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र पाटील यांना 22 मते मिळाली आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये 13 मतांच्या फरकाने भाजपने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य भगवान वाघमारे आणि काँग्रेसच्या सदस्या शारदा पाटील यांनी गैरहजर राहत भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - 'सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना तुम्ही काय दिलं?, फडणवीसांनी उगाच टीका करायची म्हणून करू नये'
गेली अडीच वर्षे जिल्हा परिषदेवर भाजप शिवसेना आणि घटक पक्षांची एक हाती सत्ता होती. राज्यात झालेल्या सत्तांतरणाचा परिणाम सांगली जिल्हापरिषदेतही काही अंशी उमटला होता. भाजपमधील नाराज नेत्यांचे समर्थक सदस्य, शिवसेना आणि घोरपडे गटाला सोबत घेऊन सत्तांतर करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला. मात्र, भाजपने नाराज नेत्यांची व मित्र पक्षांची नाराजी दूर करत रयत विकास आघाडी, अजितराव घोरपडे गट आणि शिवसेना यांच्या जोरावर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला आहे.
एक नजर पक्षीय बलाबलवर
भाजपा - 24 + 02 = 26
राष्ट्रवादी - 14 + 01 = 15
काँग्रेस - 08
शिवसेना - 03
रयत विकास आघाडी - 4
अजितराव घोरपडे गट - 02
स्वाभिमानी पक्ष - 01