सांगली - मिरजेतील बँक ऑफ बडोदा बँकेची १६ कोटी ९७ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. तारण असलेल्या कोल्ड स्टोरेज मधील बेदाणा परस्पर विक्री करून बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बँकेने आठ जणांविरोधात मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील सीएनएक्स कॉर्पोरेशन या कंपनीचे मिरज - तासगाव रोडवर कोल्ड स्टोरेज आहे, आणि कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर निरुपमा पेंडुरकर (नरिमन पॉईंट मुंबई) आणि अजित जाधव (सांगली), प्रदुमन पाटील (वसगडे), मिरा मित्तल, राहुल मित्तल (सांगली), दीपक गुरव (कवठे एकंद), गणेश पवार, (तनांग) आणि प्रशांत निकम (चिंचणी) यांनी स्टोरेज मधील बेदाणा तारण म्हणून बँक ऑफ बडोदाकडे ठेवला होता. आणि या बेदाणा तारणच्या माध्यमातून १६ कोटी ९७ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज संपल्या शिवाय, तसेच कोणत्याही परवानगी शिवाय बेदाणा विक्री करायचा नाही, असा करारपत्रही करण्यात आला होता. मात्र, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता स्टोरेजमध्ये ठेवण्यात आलेला कोटी रुपयांचा बेदाणा परस्पर विक्री करण्यात आल्याची बाब बँकेच्या निदर्शनास आली.
२०१७ पासून तारण ठेवलेल्या बेदाण्याची विक्री
बँकेने कोल्ड स्टोरेज मध्ये जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी २०१७ पासून तारण ठेवलेल्या बेदाण्याची विक्री करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे, बँक ऑफ बडोदाकडून मुंबईच्या सीएनएक्स कॉर्पोरेशन कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर निरुपमा पेंडुरकर, अजित जाधव, प्रदुमन पाटील, मिरा मित्तल, राहुल मित्तल, दीपक गुरव, गणेश पवार आणि प्रशांत निकम यांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सदर नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा- सांगली : शेतातून तब्बल 51 लाख 93 हजारांची गांजाची झाडे जप्त