सांगली - सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांचा महापूर ओसरू लागला आहे. मात्र सांगली शहरासह कृष्णा काठच्या अनेक गावांना पुराचा विळखा कायम आहे. संथ गतीने पाण्याची पातळी ओसरत आहे. सांगली शहरातील कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाण्याची पातळी दुपारी 12 वाजता 49 फूट झाली. मात्र अजून कृष्णा नदी धोक्याच्या पातळीवर आहे. त्यामुळे शहरातील पुराचे पाणी कायम असून हळूहळू ते ओसरत आहे. जवळपास दीड किलोमीटर अंतराने शहरातील पाणी ओसरले आहे.
बाजार पेठेतील पाणी बऱ्यापैकी ओसरले आहे. मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. सामान, फर्निचर अशा गोष्टींचे नुकसान झाले आहे. तर पुराच्या पाण्यामुळे दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, चिखल साचला आहे आणि आता व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानामध्ये साचलेला गाळ, कचरा बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे.
साफ-सफाई आणि औषध फवारणी
रोगराई उद्भवू नये यासाठी युद्ध पातळीवर पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम सुरू आहे. महापालिकेच्या वतीने जवळपास 20 हून अधिक स्वच्छता पथके तैनात करण्यात आले आहेत. रस्त्यावरील कचरा साफ करण्याबरोबर ज्या भागात पाणी ओसरत आहे, त्याठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे.
'महापालिकेकडून व्यापाऱ्यांना मदत केली जाणार'
या सगळ्या परिस्थितीवर बोलतांना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले, की पुराचे पाणी आता ओसरत आहे. मागील पुरात झालेल्या नुकसानापेक्षा यंदा कमी नुकसान झाले आहे. ज्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना महापालिका व राज्य शासनाकडून मदत दिल्या जाणार आहे. त्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.