सांगली- शहरासह ग्रामीण भागात दहशत माजवणाऱ्या राहुल माने टोळीवर सांगली पोलिसांकडून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी राहुल माने, पिल्या उर्फ महेश पारचे, विक्की ऊर्फ शामराव हजारे, त्यागी उर्फ राहुल भगत आणि सचिन माने या पाच जणांवर मोक्का लावला आहे.
सांगली शहरासह बुधगाव, कोल्हापूर ग्रामीण भागात दहशत माजविणाऱ्या राहुल माने टोळीवर सांगली पोलिसांनी आज मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. राहुल माने व त्याच्या साथीदारांची सांगली, मिरज आणि ग्रामीण भागासह कोल्हापूरच्या हातकणंगले येथे मोठी दहशत असून याप्रकरणी माने टोळीवर सुमारे १७ प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
नुकतेच या टोळीकडून बुधगाव येथील एकावर चाकूने हल्ला करत खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मिरज ग्रामीण पोलिसांकडून राहुल माने व त्याच्या साथीदार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. याला आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार सदर पाच आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.