सांगली - कुरळप येथील मोटारसायकल चोरट्याला गाडयांच्या स्पेअरपार्ट्सह ताब्यात घेण्यात आले आहे. करण महादेव देवकर असे आरोपीचे नाव आहे. हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी चोरीला गेल्याची तक्रार कुरळप पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील आणि सचिन मोरे हे पोलीस कर्मचारी हे तपास करत होते.
यावेळी पोलिसांना संबंधित दुचाकी चोराचा सुगावा लागला. गुप्त माहितीनुसार त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दुचाकी चोरल्याचे कबूल केले. या गडीचे सर्व पार्ट्स सुट्टे करून त्याने लपवून ठेवले होते. म्हसोबा पाणंद या ठिकाणी त्याने हे पार्ट्स लपवल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सह पोलीस निरीक्षक अरविंद काटे, अनिल पाटील, सचिन मोरे,गजानन पोतदार या कर्मचाऱ्यांनी घटनासाठी जाऊन गाडीचे स्पेअर पार्ट्स ताब्यात घेतले.
पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला. तसेच आज इस्लामपूर न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला एका दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गजानन पोतदार करत आहेत.