रत्नागिरी - एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी केलेल्या उठावाला काहीतरी कारण आहे. दरम्यान हे सर्व झालं ते जोडण्याचा प्रयत्न कोणीही करत नव्हता, याला साक्षीदार स्वतः खासदार विनायक राऊत ( MP Vinayak Raut ) आहेत, असे शिंदे गटात गेलेले आमदार उदय सामंत ( Uday Samant ) यांनी म्हटलं आहे. ते रत्नागिरीतील पाली या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्तांतर नाट्यानंतर उदय सामंत आज पहिल्यांदा उदय सामंत रत्नागिरीत आले होते.
यावेळी मोठ्या संख्येने सामंत यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सामंत म्हणाले की, माझ्यासारख्या एकाला अक्कलदाढ नसलेला, पण अक्कल असलेल्या आमदाराने ही शिवसेना एकसंध राहावी यासाठी प्रयत्न केला आहे. पण त्यामध्ये यश आलं नाही. दरम्यान आम्ही शिवसेनेतच ( Shivsena ) आहोत, बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये याला आम्हाला यश येईल, आणि प्रत्येकाचे गैरसमज दूर होतील असे सामंत यावेळी म्हणाले आहेत.
विधिमंडळातला शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे - शिवसेनेचा सर्वसामान्य शाखाप्रमुख मुख्यमंत्री होत असताना त्याचं मी आमदार म्हणून, समर्थन केलं याचा मला अभिमान असल्याचे उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले आहेत. आम्ही भाजपमध्ये गेलेलो नाही, महाराष्ट्र विधिमंडळ शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे. आमचे गटनेते हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि मुख्य प्रतोद भरतजी गोगावले आहेत. विधिमंडळातला शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे, असंही सामंत यावेळी म्हणाले आहेत.
फडणवीसांनी आज माइक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील; विनायक राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका - देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढून त्यांना नागडे करून टाकतील, अशा शब्दात विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Vinayak Raut criticized Chief Minister Eknath Shinde ) यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेला लागलेल्या बंडखोर आमदारांच्या सुरुंगानंतर शिवसेना आता पुन्हा आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करत आहे. यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा मेळावा घेत कट्टर शिवसैनिकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न सध्या शिवसेना करत आहे. आज ( शुक्रवारी ) कोल्हापुरात शिवसेनेचा मेळावा पार पडला यावेळी विनायक राऊत बोलत होते.
'शिंदेंनी देवेंद्र फडणवीससोबत जाऊन हिंदुत्वाचा मुर्दा पडला' : एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात हिंदुत्वाचा मुर्दा पडला आहे. एकनाथ शिंदे यांना कपाळावर टिळा लावण्याचाही आता नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी ठाकरे सरकारने संभाजीनगरचे नाव बदलण्याचा निर्णयाला स्थगिती दिली हे करताना एकनाथ शिंदे यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती. लाचारी पत्करताना किमान दिघे साहेबांचे तरी स्मरण करायला हवे होता, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
'क्षीरसागर म्हणजे बेईमानीची लागलेली कीड' : एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावरही विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीतच बेईमानीची लागलेली कीड मी स्वतः अनुभवली होती. घरी जेवायला बोलावून खर्च दुसऱ्याकडून करायचा ही क्षीरसागरांची वृत्ती आहे. त्यांनी मला आणि नाना पटवले ना घरी घातलेल्या जेवणाचा खर्च हा काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडून घेतले असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी त्यांच्यावर केला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचेही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तर नारायण राणे आणि केसरकर हे येत्या काही दिवसात एकमेकांच्या जीवावर बसणार आणि तो दिवस जास्त लांब नाही, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.