रत्नागिरी : खेड - दापोली मार्गावरील कुवे घाटात चिरे वाहतूक करणारा डंपर दुचाकीवर पलटी झाल्याने चिऱ्या खाली येऊन दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. यशवंत रामचंद्र कांबळे (वय ५८ ) व आदेश शिवराम शिवगण (वय २२) अशी या दुर्दैवी दुचाकीस्वारांची नावे आहेत. ते दोघेही संगमेश्वर तालुक्यातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथील यशवंत कांबळे व हातीव येथील आदेश शिवराम शिवगण हे दोघे दापोली तालुक्यातील वणंद येथे माता रमाई जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी चालले होते. आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ते खेड - दापोली मार्गावरील कुवे घाट चढत असताना समोरून एक डंपर आला. कांबळे यांची दुचाकी डंपरच्या बाजूने मार्गक्रमण करत असतानाच अचानक तो डंपर त्यांच्या दुचाकीवरच पलटी झाला. या अपघातात डंपरमध्ये असलेल्या चिऱ्यांखाली दुचाकीस्वार दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातादरम्यान झालेला जोराचा आवाज ऐकून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निलेश शेठ, उपसरपंच दिनेश जाधव, संतोष देवरुखकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, या अपघाताबाबत खेड येथील मदत ग्रुपच्या सदस्यांना कळताच मदत ग्रुपचे सदस्य आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. चिऱ्यांखाली दबल्याने गतप्राण झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना चिरे हटवून बाहेर काढण्यात आले. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वारांच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. खेड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.