रत्नागिरी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी बाबत केलेल्या सकारात्मक विधानावरून रिफायनरी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. रिफायनरी नाणारमध्येच काय कोकणात कुठेही होऊ देणार नाही. मुख्यमंत्री कोकणात पुन्हा हा चर्चेचा विषय करत असतील तर कोकणी जनतेच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिला आहे.
अधिसुचना रद्द करण्यात आलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. महाजनादेश यात्रा रत्नागिरीत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक वक्तव्य करत या प्रकल्पाबाबत पुन्हा फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत. यावरून रिफायनरी विरोधातील मोठा लढा उभारणारे अशोक वालम यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत त्यांना इशारा दिलेला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राजापूरमध्ये आले असता त्यांनी रद्द झालेली रिफायनरी काही दलालांच्या समर्थनार्थ चर्चेत आणून त्याच्यावर फेरविचार करू असे वक्तव्य केले आहे. आज आम्हाला लाज वाटते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही महिन्यांतच आपली भूमिका कशी बदलू शकतात. ही शोकांतिका आहे की महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री लाभले. ही रिफायनरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत नाणार तर सोडाच कोकणात कुठेही होऊ देणार नाही असा इशारा पुन्हा एकदा अशोक वालम यांनी दिला आहे. कोकणातली जनता काय आहे हे वेळ आल्यावर आम्ही दाखवून देऊ. आम्ही दोन वर्ष जी लढाई केली ती शांततेत केली होती. मुख्यमंत्री दलालांच्या नादाला लागून जर पुन्हा असे वक्तव्य करून नाणार रिफायनरी मुद्दा घेऊन कोकणात पुन्हा चर्चेचा विषय घेऊन येत असतील तर त्यांना कोकणातील जनतेच्या रोषाला सामोरं जावे लागेल, असे वालम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- नाणार पुन्हा 'पेटणार'? मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पावरून मोठे विधान...