रत्नागिरी - शहरातील विद्यार्थ्यांनी आज मानवी साखळीद्वारे भारत निवडणूक आयोगाचा लोगो तयार करुन मतदानाचा एक वेगळा संदेश दिला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर विविध शाळा महाविद्यालयांमधील २८०० हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षकांनी मानवी साखळीद्वारे हा लोगो बनवला. या सोहळ्याच्या निमित्ताने स्वीप (सिस्टेमेटीक व्होटर्स एज्यूकेशन अॅन्ड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्राम) अंतर्गत मतदार जागृतीचा एक कार्यक्रम सादर झाला.
शिस्तबध्दरित्या शाळकरी मुले आणि मुलींनी मैदानावर आयोगाचा लोगो साकारला. प्रशासनातर्फे कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वांसोबत जिल्हाधिकारी व निवडणुक निर्णय अधिकारी देखील मानवी साखळीत सामील झाले. कार्यक्रमात सेंट थॉमसच्या बँडने सुरेल धून सादर केल्या. पथनाट्याचे सादरीकरण यावेळी झाले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोअर कमिटी करण्यात आली होती. या कमिटीत मंदार सावंत, संध्या सावंत, रुपेश पंगेरकर, इम्तियाज शेख, किरण जोशी, कृष्णा गावडे, नाना पाटील, निलेश पावसकर, विनोद मयेकर, शशिकांत कदम, राजेंद्र कांबळे, आगा सर, विश्वेश टिकेकर ढवळे आदिंचा समावेश होता.
या भव्य अशा उपक्रमात पटवर्धन हायस्कूल, शिर्के प्रशाला, फाटक प्रशाला, आय.टी.आय., सेक्रेट हार्ट कॉन्व्हेन्ट, एम.एस नाईक हायस्कूल, एम.डी. नाईक हायस्कूल, जी.जी.पी.एस, गो.दा. जांभेकर विद्यालय, ए.के. देसाई हायस्कूल, मिस्त्री हायस्कूल, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, पॉलिटेक्नीक, रत्नागिरी , डी. एन. कॉलेज, सेंटथॉमस विद्यालय आदिंचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व उपस्थितींना मतदानाची शपथ दिली. या भव्यदिव्य आयोजनाबद्दल त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आणि त्यांचे सहकारी तसेच सहभागी झालेल्या सर्वांचे अभिंनंदन करीत तसेच सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन करीत अभार मानले.
वंदेमातरम गीताने दीड तास चाललेल्या या अविस्मरणीय सोहळयाची सांगता झाली. या सोहळ्याला बघण्यासाठी शेकडो नागरिक स्टेडियमवर उपस्थित होते. स्वीप कार्यक्रमाच्या प्रमुख असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे आदिंची या कार्यक्रमास उपस्थिती होती.