रत्नागिरी - दुबईतून रत्नागिरीत आलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेच्या दृष्टीने कडक पावलं उचलण्यात येत आहेत. हा रुग्ण दुबईतून गुहागर तालुक्यातील शृंगारतळीत आला होता. त्याच्यात कोरोनाची लक्षणं दिसल्याने १७ तारखेला तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर बुधवारी रात्री तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
सध्या हा रुग्ण व्यवस्थित असून घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या रुग्णाच्या कुटुंबीयांना तसेच हा रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला होता त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तसेच शृंगारतळीतील ३ किमी परिसर आयसोलेट करण्यात आला आहे. तर, पुढील २ किमीचा परिसर सुद्धा बफरझोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यात परिसरात अन्य कोणालाही फिरता येणार नाही, बाजारपेठ, बँका व इतर दुकानेही बंद ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - रत्नागिरीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानं खळबळ; आरोग्य यंत्रणा सतर्क
दरम्यान, जिल्ह्यातील एसटीसेवा येत्या ४ ते ५ दिवसानंतर टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिश्रा यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील हॉटेल, बार, दारूची दुकाने आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद केली जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असून या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्याचप्रमाणे परदेशातून आलेल्या व्यक्तींनी स्वतःची वैद्यकीय चाचणी करून घ्यावी, तसेच अशा व्यक्तींची माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण कुटुंबावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - #COVID-19 : खबरदारीसाठी कोकण रेल्वेची स्थानके चकाचक