रत्नागिरी - राज्यभर सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. सर्वच पक्षाच्या स्टार प्रचारक नेत्यांची शाब्दिक तोफ धडाडताना दिसत आहे. मात्र, या नेत्यांमध्ये सध्या शिवसेनेची बुलंद तोफ म्हणजेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम सध्या कुठेही दिसत नाहीत. शिवसेनेची ही मुलुख मैदानी तोफ म्हणजेच रामदास कदम दापोली विधानसभा मतदारसंघातच चिरंजीवाच्या प्रचारात अडकून पडले आहेत.
हेही वाचा - भारतीय अर्थव्यवस्था लवकर रुळावर येईल असे वाटत नाही, नोबेल विजेते बॅनर्जींनी व्यक्त केली चिंता
रामदास कदम संपूर्ण राज्याला परिचित आहेत ते त्यांच्या बेधडक वक्तृत्व शैलीमुळे. जे आहे ते स्पष्टपणे आणि मनात काहीही न ठेवता बोलणारे नेते म्हणून रामदास कदम यांची एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे.
रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम पहिल्यांदाच दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेली चार वर्ष त्यांनी चांगली तयारीही केली आहे. वडील पर्यावरण मंत्री असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून शेकडो कोटींची विकासकामे योगेश कदम यांनी मतदारसंघात केली आहेत. विकासकामे करताना योगेश कदम यांनी मतदारसंघ पुन्हा नव्याने बांधला. त्यामुळे साहजिकच विजयाची त्यांना अपेक्षा आहे. मात्र, त्यांच्यासमोर आव्हान खडतर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय कदम यांनी गेल्यावेळी निवडून आल्यानंतर मतदारसंघात आपला चांगला जम बसवला आहे. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. पण संजय कदम यांची जमेची बाजू म्हणजे रामदास कदम यांच्यावर असलेल्या नाराजीचा फायदा संजय कदम यांना होण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेच्या सुर्यकांत दळवी यांचा रामदास कदम यांना विरोध आहे. पाच वेळा दळवी आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे आजही त्यांची दापोलीत ताकद आहे. पण दळवी रामदास कदम यांच्या विरोधात आहेत. दुसरीकडे स्थानिक भाजपही योगेश कदम यांच्या प्रचारात फार दिसत नाही. त्यात शिवसेनेने कुणबी उमेदवार न दिल्यामुळे थोडीफार कुणबी समाजाचीही नाराजी आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक आव्हाने योगेश कदम यांच्यासमोर आहेत. त्यामुळेच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी कोणत्याही परिस्थितीत चिरंजीव योगेश कदम यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. रामदास कदम यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राजकीय विश्लेषक शिरीष दामले म्हणाले, संजय कदम हे रामदास कदम यांच्या पठडीत तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांना नामोहरम कसं करायचं हे संजय कदम यांना चांगलं माहिती आहे. पण निवडणूकीचे डावपेच म्हणून रामदास कदम यांना इतर पक्षांनी त्या ठिकाणी अडकवून ठेवलेलं नाही, तर तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे रामदास कदम हे त्या दापोली मतदारसंघात अडकून पडल्याचं दामले यांनी म्हटले आहे.
पण एकूणच योगेश कदम यांना ही लढत सोपी नसून दोघांमध्ये कांटे की टक्कर होणार एवढं मात्र नक्की.
हेही वाचा - बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज