रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून सध्या राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी गडकरी यांना टोला लगावत काही सवाल उपस्थित केले आहेत.
चिपळूणमध्ये बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, ज्या रस्त्याच्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे, त्या रस्त्याचं काम हे 10 टक्के रखडलेलं आहे. जर 10 टक्के रखडलेल्या कामाला गडकरी शिवसेनेला जबाबदार धरत असतील, तर 90 टक्के पूर्ण झालेल्या कामाचं श्रेय देखील शिवसेनेला मिळालं पाहिजे, असे म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी नितीन गडकरी यांना टोला लगावला आहे. तसेच नितीन गडकरी यांनी कोरोना काळात राज्यातील भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना सुनावले होते. त्यामुळे भाजपामधील नाराजी दूर करण्यासाठी गडकरींनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असावे, असे आमदार जाधव यांनी म्हटले आहे. शिवसेनेला सुनावण्यासाठी गडकरींवर कोणाचा तरी दबाव असावा, असा दावा देखील भास्कर जधव यांनी केला आहे.
जन आशीर्वाद यात्रेतून जनतेच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ही अपेक्षा
दरम्यान राज्यातील भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला आमदार भास्कर जाधव यांनी शुभेच्छा देत काही प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळतील, अशी अपेक्षा भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे. महागाई का वाढली, इंधनदर का वाढले, जीडीपी का घसरला, पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का? या प्रश्नांची उत्तरं जन आशीर्वाद यात्रेतून भाजपाने द्यावीत, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - माझे बोलणे मोडून-तोडून दाखवले- आमदार भास्कर जाधव