रत्नागिरी - भाजपचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेला विधानसभेच्या 12 जागा हव्या आहेत. तशी मागणी भाजपच्या नेत्यांकडे करण्यात आली असून या जागांसंदर्भात दोन बैठकाही झाल्या असल्याची माहिती शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सोमवारी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - रिफायनरी नाणारमध्येच काय कोकणात कुठेही होऊ देणार नाही- अशोक वालम
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपाबाबत चर्चाही सुरू आहेत. त्यात भाजपबरोबर असलेल्या इतर घटक पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप नेत्यांबरोबर त्यांच्या बैठकाही सुरू आहेत. दरम्यान, शिवसंग्रामलाही 12 जागा हव्या आहेत. शिवसंग्राम हा भाजपचा घटक पक्ष म्हणून राज्यात कार्यरत आहे, आम्ही भाजपच्या नेत्यांकडे 12 जागांची मागणी केली आहे, याबाबत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये दोन बैठका झाल्या आहेत. 12 पैकी किमान 7 जागा आम्हाला मिळतील, अशी आम्हाला आशा असल्याची माहिती शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - नाणार पुन्हा 'पेटणार'? मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पावरून मोठे विधान...
बीड, मुंबई, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद, परभणी, वाशिम, अकोला या ठिकाणच्या जागांची मागणी करण्यात आली आहे. विनायक मेटे याही वेळी बीड मतदारसंघातूनच लढतील, अशी माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली.