रत्नागिरी - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त 28 मे'ला सावरकर यांची नात विनता जोशी रत्नागिरीमध्ये येत आहेत. महिला शाहीर म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्यासोबत पुण्यातून सावरकर प्रेमीही येत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन पतितपावन मंदिर, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ व रत्नागिरीतील सावरकर प्रेमी, तसेच पुण्यातील ओडिसी व्होयेज इंडिया, (एलएलपी) यांनी केले आहे.
सावरकर यांची नात विनता जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पतितपावन मंदिरामध्ये कार्यक्रम होणार आहेत. विनता जोशी यांचा पतितपावन मंदिरामध्ये सादर होणारा हा पहिलाच कार्यक्रम असून हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता सादर होणार आहे. यावेळी पतितपावन मंदिर आणि अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे विनता जोशी यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर यांनी दिली. पदाधिकारी राजू जोशी व संस्थेचे सर्व सदस्य कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.
विनता जोशी या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांची नात आहेत. त्या महिला शाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत. १९८३ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी वर्षापासून सावरकरांच्या कार्याचा प्रचार व प्रसार या उद्देशाने पोवाडे व सावरकर गीते कार्यक्रमांना त्यांनी प्रारंभ केला. फेब्रुवारी 2019 पर्यंत 36 वर्षात देशात व परदेशात मिळून 1 हजार 5 कार्यक्रमांचे त्यांनी यशस्वी सादरीकरण केले आहे. एक हजाराव्या कार्यक्रमाचे सादरीकरण त्यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी अंदमान येथे केले आहे. किल्ले रायगडावरील 'शाहिरी रात्र' कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या त्या एकमेव महिला शाहीर होत्या.
पुण्यातील सावरकरप्रेमींना रत्नागिरीत आणण्याचे नियोजन ओडिसी व्होयेज इंडिया, (एलएलपी) संस्थेच्या मानसी नगरकर-जाधव या करत आहेत. सावरकर यांच्या रत्नागिरीतील कार्याची ओळख पुण्यातील सावरकरप्रेमींना व्हावी असा त्यांनी संकल्प केला आहे. विशेष म्हणजे सावरकर यांची नात विनता जोशी यांच्यासोबत सावरकरप्रेमींना रत्नागिरीत आणून येथील सावरकर यांचे वास्तव असलेल्या वास्तूंना भेट घडवून आणण्याचे कार्य त्या करत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची महती सांगणाऱ्या रत्नागिरीतील वास्तू पतितपावन मंदिर, विशेष कारागृहातील खोली, शिरगाव येथील दामले यांनी सावरकर यांचे वास्तव्य असलेली जतन करण्यात आलेली खोली आदी ठिकाणी विनता जोशी व पुण्यातील सावरकरप्रेमी भेट देणार आहेत. विशेष कारागृहाला त्या सकाळी 9 वाजता भेट देणार असून याठिकाणीही त्या छोटेसे सादरीकरण करणार आहेत.
रत्नागिरीतील सावरकरप्रेमींनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पतितपावन मंदिर रत्नागिरी, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळतर्फे अॅड. बाबासाहेब परुळेकर आणि विनता जोशी, मानसी नगरकर-जाधव यांनी केले आहे.