रत्नागिरी - जिल्ह्यातल्या चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटी दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. 2 जुलै 2019 ची अमावस्येच्या रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि धरणानजीक वसलेल्या भेंदवाडीचे होत्याचे नव्हते झाले. भेंदवाडीतील 22 घरे, जनावरांचे गोठे आणि 22 जण या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले होते. या दुर्घटनेत एकूण 22 जण बेपत्ता झाले होते. 22 पैकी 21 मृतदेह सापडले. मात्र, तेव्हा दीड वर्षांची असणारी दुर्वा अद्यापही बेपत्ता आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले अरुण पुजारे यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. या बातचित दरम्यान, त्यांनी आपण डोळ्यासमोर मृत्यू पाहिल्याचे सांगितले.
अरुण पुजारी हे कामानिमित्त मुंबईला असतात. त्यांचे तिवरे धरण परिसरात दुमजली घर आहे. ते या दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वीच गावी आले होते. त्यांना क्रिकेट मॅच आणि ट्रेकिंगची आवड आहे. 2 जुलैला ते पत्नी अंजलीसह क्रिकेटचा सामना पाहत होते. तेव्हा अचानक पाण्याचा लोंढा आला. हे पाहून अरुण आणि त्यांची पत्नी अंजली घाबरले. त्यांनी धीर न सोडता, यातून बाहेर पडण्याचे ठरवले. मोठ्या धैर्यांनी त्यांनी त्या परिस्थितीचा सामना केला. एकमेकांना मदत करत ते बाहेर पडले.
तिवरे धरण दुर्घटनेतून आम्ही बचावलो. त्यावेळी आम्हाला आमचा मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता, असे अरुण पुजारे यांनी सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेत पुजारे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घराचा अर्धा भाग पाण्याच्या लोंढ्याने गिळंकृत केला. या दुर्घटनेतून सावरल्यानंतर त्यांनी आपल्या आपल्या घराची डागडुजी केली.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: तिवरे धरण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण...
हेही वाचा - 'गृहमंत्री राज्याचे जबाबदार मंत्री, त्यांनी कारवाईची भाषा करू नये'