रत्नागिरी - पक्षातील तडजोडीनुसार ठरल्याप्रमाणे अखेर रत्नागिरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नगराध्यक्ष राहुल पंडित हे थेट जनतेतून निवडून आले होते. मात्र, आता राहुल पंडित यांनी पक्ष आदेशाचे पालन करत सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.
पंडित यांच्या राजीनाम्यामुळे आता थेट नगराध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. या पदासाठी सेनेकडून विद्यमान उपनगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांची उमेदवारी निश्चित असून विरोधकांकडूनही मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.
राहुल पंडित 2016 मध्ये थेट नगराध्यक्षपदी निवडून आले, मात्र अडीच वर्षांचा कार्यकाळ संपताच त्यांनी राजीनामा द्यावा अशी पक्षांतर्गत तडजोड झाली होती. त्यानंतर त्यांनी 2 वर्ष होताच आपल्या पदाचा राजीनामा रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचरणी ठेवला होता. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या, मात्र शिवसेना नेत्यांकडून हा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता.
लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू झाल्यावर पंडित यांच्याकडे खास जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली होती. या काळात कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना संघटनेने तीन महिने रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 12 जानेवारीला प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार हाती घेतला. लोकसभा निवडणुकीपूर्वी या पदाची सूत्रे हातात घेताना बंड्या साळवी यांनी अनेक विकासात्मक बाबींना चालना देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तीन महिन्यांच्या सुट्टीच्या कालावधीनंतर नगराध्यक्ष राहुल पंडित हे कागदोपत्री पुन्हा हजर झाले. तरीही नगराध्यक्ष पदाचा प्रभारी कारभार बंड्या साळवी यांच्याकडेच होता. त्यानंतर अखेर सोमवारी संध्याकाळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.