रत्नागिरी - मुंबई पुण्याहून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांना आता गावातच रेशन धान्य मिळणार आहे. शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून हजारो चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात आले होते. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने हे चाकरमानी गावातच अडकून पडले आहेत. या हजारो चाकरमान्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऑनलाईन पोर्टेबिलिटीचा वापर करून मुंबईतील रेशन कार्डवरील धान्य गावातील रेशन दुकानांवर उपलब्ध करावे, असा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी काढला आहे.
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी १० एप्रिल रोजी शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन चाकरमान्यांना गावातच रेशनचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने चाकरमान्यांची गैरसोय दूर केली आहे. चाकरमान्यांना धान्यपुरवठा करताना धान्याचा कोटा वाढवावा लागला, तर तसा अहवाल सादर करावा, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई पुण्याहून ८९ हजार चाकरमानी आले असल्याची प्रशासनाची आकडेवारी आहे.