रत्नागिरी : बारसूतील रिफायनरी विरोधी आंदोलनात आज रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची वाट अडवली. आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिस बंदोबस्त बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. आता पोलीस या आंदोलकांवर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकारामुळे बारसू परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिफायनरीचा मुद्दा अजून तापण्याची चिन्हे : रिफायनरी सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. प्रशासनाने नागरिकांना समज दिली. तरीही नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आज रिफायनरी मुद्दयावर पत्रकार परिषदही घेणार आहेत. या आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा अजून तापण्याची चिन्हे आहेत. बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना सोमवारी राजापूरमध्ये अटक झाली. त्यांच्या आणखी दोन सहकाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांना रत्नागिरीत ठेवले असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रसार माध्यमांना आंदोलन स्थळावरून हटवण्याचा प्रयत्न : आंदोलकांनी प्रकल्प हद्दपार होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी येथे जवळपास दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे. रिफायनरीला विरोध केल्यामुळे सोमवारी वैभव कोळवणकर यांच्या अटकेनंतर आंदोलकांचे अटकसत्र सुरू आहे. पोलिसांनी प्रसार माध्यमांना बारसू आंदोलन स्थळावरून हटवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
माध्यम प्रतिनिधींना पोलिसांची दमदाटी : स्थानिकांचा रिफायनरीला प्रचंड विरोध दिसून येत आहे. माध्यम प्रतिनिधींना पोलिसांनी दमदाटी केली. पोलिसांनी काही पत्रकारांना हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या भागातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणापूर्वी रत्नागिरी पोलिसांनी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या गावांमध्ये सीआरपीसीचे कलम 144 लागू केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध आहे. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ४५ स्थानिक रहिवाशांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.
जालियनवाला हत्याकांड होऊ शकते - रत्नागिरीतील वादग्रस्त प्रकल्प रिफायनरीसाठी सध्या जागेचे सर्वेक्षण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, या सर्वेक्षणाला रत्नागिरीतील स्थानिक नागरिकांनी व पर्यावरण प्रेमी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. रत्नागिरीतील बारसू या गावात स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमी संघटना आंदोलनाला बसल्या आहेत. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलीस बळाचा वापर करून धमकावले जात आहे, असा आरोप तिथल्या स्थानिकांनी केला आहे. तर, हे लोकं मागे न हटल्यास तिथे पोलिसांच्या मदतीने भविष्यात दुसरे जालियनवाला हत्याकांड होऊ शकतो. असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईतील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
मंत्री सामंत - शरद पवारांमध्ये चर्चा - बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत शरद पवार यांनी उदय सामंत यांच्यात फोनवर चर्चा केली आहे. कोकणातील बारसू रिफायनरी सर्वेक्षण काम लवकरच सुर होणार आहे. सर्वेक्षणाविरोधामध्ये आज दुसऱ्या दिवशीही आंदोलकांचा विरोध कायम आहे. आंदोलनाची दखल घेतली शरद पवार यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सोबत फोनवर चर्चा केलीची माहिती समोर येत आहे .
अजित पवार यांची प्रतिक्रिया - बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करु नये असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट केले आहे. पोलिसांनी दंडूकशाहीने सर्वेक्षण करु नये, असे अवाहन त्यांनी ट्विटरवरून केले आहे. आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करू नये, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया - रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. प्रशासन आणि स्थानिक यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे पत्र पाठविले होते, असा दावा खुद्द उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केल्यानंतर ठाकरेंच्या पत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया - आधी 'आरे'ला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला, आता रिफायनरीला विरोध करीत आहेत. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र, केवळ राजकारणासाठी विरोध करणार्यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याची सुपारी कुणाकडून देण्यात आली असा सवाल देखील फडणवीस यांनी विचारला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक - रिफायनरी वादाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या रिफायनरीच्या वादावरून मातोश्रीवर खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर यांची बैठक पार पडली. या कोकणातील नेत्यांमध्ये तब्बल चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. खासदार विनायक राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पंचाईत झाली नाही. आज सत्तेत असलेल्या सरकारने हजारो कोटी रुपये भूमाफियांच्या खिशात घालण्याचा डाव आखला आहे. बारसू परिसरातील रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी महिला ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना भर उन्हात बेदम मारहाण करण्यात आली. तेथे गेलेल्या पत्रकारांचाही पाठलाग करण्यात आला. त्यांना राजापूरला नेण्यात आले असा आरोप राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा : रत्नागिरीत रिफायनरी समर्थक संघटनेचे लाक्षणिक उपोषण