रत्नागिरी - शिवसेनेने शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चाची माजी खासदार निलेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेला विमा कंपन्या भिक घालत नाहीत, म्हणून शिवसेनेला आता विमा कंपन्यांच्या गेटवर मोर्चा काढावा लागत आहे. यावरूनच शिवसेनेची औकात कळते, अशा बोचऱ्या शब्दात राणेंनी शिवसेनेच्या मोर्चावर 'प्रहार' केला.
यावेळी राणे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी काही करायचे होते, तर मग मुख्यमंत्र्यांसोबत बसून हा विषय सोडवला गेला असता. मात्र, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी शेतकऱ्यांसाठी केल्यासारखे दाखवण्यासाठीचा हा मोर्चा असल्याचे मत राणेंनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांसाठी मोर्चा कुठून काढला तर बीकेसीतून, जिथे मातोश्री अगदी बाजूला आहे. त्यामुळे या प्रश्नासाठी शिवसेना पक्ष प्रमुखांना जास्त मेहनत घ्यावीशी वाटली नाही, अशा शब्दात निलेश राणेंनी शिवसेनेच्या मोर्चावर प्रहार केला आहे.