रत्नागिरी - भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवरून युतीत सध्या घोळ सुरू आहे. सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध आहे. मात्र, शिवसेना सोमय्या यांच्या उमेदवारीवरून रडीचा डाव खेळत असल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी केली. तसेच भाजपने शिवसेनेसमोर झुकू नये, असे आवाहनही राणे यांनी केले आहे. देवरुख येथे निलेश राणे यांच्या प्रचार सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
या प्रचारसभेला डॉ. निलेश राणे, निलमताई राणे, राजन देसाई, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदीप कुरतडकर, बापू सुर्वे, रवींद्र नागरेकर यांच्यासह अनेक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या ५ वर्षांत शिवसेना, मातोश्री आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. ही टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. त्यामुळेच शिवसेनेने सोमय्यांच्या उमेदवारीत खोडा घातल्याचे बोलले जात आहे.
याबाबत देवरुख येथे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी आलेल्या नारायण राणे यांना विचारले असता, किरीट सोमय्या हे भाजपचे चांगले खासदार आहेत. सोमय्या सीए असून ते अभ्यासू आहेत, त्यांना तिकीट मिळाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.