रत्नागिरी : राजापूरमधील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघाती संशयास्पद मृत्यू झाला आहे. याबाबत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटूंबीयांची खासदार विनायक राऊत यांनी आज भेट घेतली. वारीशे यांच्या मुळ गावी राजापूर तालुक्यातील कशेळी गावी जात वारीशे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
वारीशे कुटुंबावर शोककळा : सोमवारी थार गाडी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात शशिकांत वारीशे यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
कुटुंबाची जबाबदारी शशिकांत वारीशे यांच्यावर : शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबांमध्ये एकूण 3 जण आहेत. त्यांचा मुलगा यश, त्यांची आई शेवंती वारीशे आणि शशिकांत वारीशे असे तिघेजण कुटुंबातील सदस्य आहे. वारीशे यांचा मुलगा यश आयटीआयचे शिक्षण घेत आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शशिकांत वारीशे यांच्यावरच होती. शशिकांत वारीशे यांच्यावरच त्यांच्या कुटुंबाचा डोलारा होता.
उद्धव ठाकरेंनी घेतली गंभीर दखल : आज खासदार विनायक राऊत यांनी वारीशे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन वारीशे यांची आई आणि त्यांचा मुलगा यांचं सांत्वन केले. दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे देखील या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे खासदार राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.
हत्येचा ठाकरे गटाचा आरोप : नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी एसआयटी अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एसआयटी स्थापन करण्याची मागणी : लवकरात लवकर एसआयटी स्थापन करून या प्ररकणाचा तपास करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. शशिकांत वारिसे यांच्या हत्येच्या २४ तास आधी राज्याचे गृहमंत्री सांगतात की, रिफायनरीला कोण आडवं येतंय ते पाहू आणि नंतर दुसऱ्याच दिवशी रिफायनरीला आडवा येणारा पत्रकार मारला जातो, याचा काय संबंध लावायचा, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.