रत्नागिरी - स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णयाचा पुनर्विचार करावा असा सल्ला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार सर्वत्र शाळा सुरू होत आहेत. यावरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत पुन्हा विचार करावा, असे सामंत म्हणाले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार
आजपासून शाळा सुरू झाल्या असल्या, तरी मिळालेला प्रतिसाद अत्यल्प आहे. तसेच पालकांमध्ये देखील चिंता दिसत आहे. या सर्व बाबींचा विचार करता, तसेच राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता 8 ते 10 दिवसानंतर याचा आढावा घेण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत बोलणार असल्याचं सामंत म्हणाले.
लोकनेता कोण, हे स्पष्ट आहे
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी समाचार घेत प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच सांगतात, 'मी राजकारणात शरद पवार साहेबांचं बोट धरून आलोय'. त्यामुळे आता लोकनेता कोण आहे, हे स्पष्ट झालंय, असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते पडळकर
ज्या पक्षाचे चार खासदार निवडून येतात. त्यांना तुम्ही लोकनेते म्हणता. मग 303 खासदार निवडून आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे, असे म्हणत पडळकर यांनी पवारांना टोला लगावला होता. तुम्ही मोदींवर टीका करता. आम्ही शरद पवारांवर टीका केली, तर मग इतका त्रागा का करता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. गोपीचंद पडळकर यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारासाठी सांगलीत आल्यानंतर हे वक्तव्य केले होते.