रत्नागिरी- निसर्ग वादळामुळे अनेक अनेकांना संकटांचा सामना करावा लागत वेगवेगळ्या परिस्थितीतून जावे लागत आहे.शिगवण गावातील एका नवजात बालकाच्या आयुष्याची सुरुवातही वादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत झाली आहे. ज्या ठिकाणी मुलांच्या भविष्याच्या जडणघडणीची सुरुवात होते, त्याच शाळेच्या इमारतीत आपल्या मातेच्या कुशीत राहत या बालकाचा जीवन प्रवास सुरु झाला आहे.
मंडणगड तालुक्यातील शिगवण गावातील संजय जगताप यांची मुलगी सागरिका बामणे बाळंतपणासाठी माहेरी आलेली. मात्र, 3 जूनच्या निसर्ग वादळात तिच्या वडीलांचे घर उद्धवस्त झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी गावातच असणाऱ्या शाळेत आसरा घेतला.
वादळाच्या तीन दिवसानंतर सागरिका यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र,वडिलांचे घरच पडल्याने सागरिकाला बाळासह कुटुंबासोबत या शाळेत राहावे लागत आहे. शाळेचेही पत्रे उडाले आहेत, लाईट नाही, शौचालयाची व्यवस्था नाही,अशा परिस्थितीत हे कुटुंब सध्या राहत आहे.नवजात बालकाला घेऊन अशा परिस्थितीत राहावे लागतेय याहून भीषण परिस्थिती काय असू शकते, असा प्रश्न निर्माण होतो.