रत्नागिरी- यावर्षी कोकणात मान्सून लांबणीवर असून पाऊस कमी पडेल, असा अंदाज प्रा. उदय बोडस यांनी वर्तवला आहे. गेल्या २१ वर्षापासून स्वत:च्या बागेत उगवणाऱ्या दोन झाडांच्या निरिक्षणातून प्रा. उदय बोडस यांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरत आहे. यावर्षीही ११ जून नंतर पाऊस पडेल, असा अंदाज बोडस यांनी वर्तवला आहे. निसर्गाने बोडस यांच्या बागेत याची चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे.
कोकणात गेल्यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडला. यावर्षीही जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. यंदा कोकणात पाऊस ११ जून नंतर पडेल असा अंदाजही प्रा. उदय बोडस यांनी वर्तवला आहे. गेली २१ वर्ष त्यांचा अंदाज चुकलेला नाही. बोडस हे निसर्गप्रेमी आहेत. बागेत काम करणाऱ्या जुन्या जाणत्या मजुरांनी त्यांना निसर्ग वाचायला शिकवला. त्यामुळेच पावसाचे संकेत देणाऱ्या वनस्पतींची बोडस यांना चांगली जाण आहे.
वनस्पतींच्या माध्यमातून वर्तवतात पावसाचा अंदाज
बोडस यांची पोमेंडी येथे बाग आहे. या बागेत एका मळीत उगवणाऱ्या आधेलेफोक आणि दिंडा या दोन वनस्पतींच्या माध्यमातून ते आपला पावसाचा अंदाज वर्तवतात. मात्र, यावर्षी आधेलेफोकने मान वर काढलेली नाही, तर दिंडाही आत्ता उगवू लागला आहे. त्याच मळीत उगवलेल्या पावसाच्या वेलीही अर्धमेल्या झाल्या आहेत. बोडस यांच्या बागेत साधारणतः रोहिणी नक्षत्राच्या आसपास दिंडा आणि आधेलेफोक उगवतात. या दोन वनस्पती उगवल्या की त्यांच्या उंचीच्या गुणाकारा इतक्या दिवसांनी पाऊस पडतो, असा बोडस यांचा ठोकताळा आहे.
गेल्या वर्षीचा अंदाज ठरला खरा
गेल्यावर्षीही या दोन वनस्पती उगवल्यानंतर ५ जूनला पाऊस पडेल, असा अंदाज बोडस यांनी वर्तवला होता आणि ४ जूनलाच रात्री पावसाला सुरुवात झाली. यावर्षी मात्र बोडस यांच्या बागेत या दोन्ही वनस्पती एकत्र दिसत नाहीत, त्यामुळे यंदा मान्सून ११ जूनपर्यंत पाऊस पडणार नाही. ११ जून नंतरच आणि वटपौर्णिमेच्या आसपास पाऊस पडेल, असा अंदाज बोडस यांनी वर्तविला आहे.
बोडस यांच्या बागेत ज्या ठिकाणी या दोन वनस्पती उगवतात, त्या ठिकाणापासून जवळपास २०० फूट अंतरावर एक आधेलेफोक उगवला आणि तो तीन दिवसातच मेला. हे पर्जन्यमान कमी होण्याचा संकेत आहे. त्यामुळे बोडस यांच्या मते यावर्षी ८७ टक्केच पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.
महामार्गावरील वृक्षतोडीचा पावसावर परिणाम
भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणातही पावसाच्या अनिश्चिततेचे ढग जमू लागले आहेत. त्यात महामार्ग कामामुळे यंदा जवळपास वीस हजार पेक्षा जास्त झाडे तोडली गेली आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही, तर बोडस यांच्या म्हणण्याप्रमाणे दुष्काळाचे सावट कोकणातही घर करायला वेळ लागणार नाही.