रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्यातील पावस बाजारपेठेत पाखाडीला लागून असलेली संरक्षक भिंत कोसळून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या बालकाचे नाव सुरज सागर वडापकर (9) असे आहे. तो जिल्हा परिषद शाळेत तिसरी इयत्तेमध्ये शिक्षण घेत होता. बुधवारी सायंकाळी शाळा सुटल्यावर तो घरी आला. यावेळी शौचालयात जाण्यासाठी घराबाहेर पडला. पाऊस पडत असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला थांबवत सोबत येतो असे सांगितले. मात्र, तुम्ही येऊ नका मी जातो असे सांगून तो घराबाहेर पडला.
याचवेळी पाखाडीने शौचालयाच्या दिशेने जात असताना, एका घराची संरक्षक भिंत त्याच्या अंगावर कोसळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने, त्याच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. चिर्याखाली अडकलेल्या सुरजला बाहेर काढून त्यांनी आपल्या खांद्यावर घेत, खासगी दवाखान्यात धाव घेतली. मात्र, त्याठिकाणी डॉक्टर नसल्याने त्याला पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डोक्याला दुखापत झाल्याने प्रकृती गंभीर बनल्यामुळे त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच सुरजचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व शेजार्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सुरजच्या अकाली जाण्याचा मोठा धक्का घरातील सर्वांना बसला आहे. सुरजचे वडील मासेमारी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, कधी खलाशी म्हणून कामाला जातात. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठी बहिण असा परिवार आहे. या घटनेची माहिती पूर्णगड पोलिसांना कळवण्यात आली आहे.