रायगड : शासनाने कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने हजारो परराज्यातील मजूर, कामगार हे रायगड जिल्ह्यात विविध तालुक्यात अडकून पडले होते. असेच मध्य प्रदेश राज्यतील पनवेल, नवी मुंबईत अडकलेले १ हजार २०० मजूर, नागरिक यांना विशेष रेल्वेने भोपाळ मधील रेवा याठिकाणी रवाना केले. लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले हे मजूर आता 42 दिवसाने आपल्या मूळगावी पोहचणार असल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मध्य प्रदेश, महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाचे आभार मानले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून शासनाने कडक पावले उचलून तो रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सगळीकडे सर्व व्यवसाय, कामधंदा बंद झाल्याने परराज्यातून रायगड जिल्ह्यात विविध तालुक्यात कामानिमित्त आलेले नागरिक हाताला काम नसल्याने अडकून पडले. लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक सेवाही बंद झाल्याने परराज्यतील नागरिक हे अडकले गेले. केंद्र आणि राज्य शासनाने या नागरिकांना पुन्हा त्यांच्या गावी पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते.
पनवेल, नवी मुंबईत मध्य प्रदेश राज्यातील सुमारे १ हजार २०० मजूर, नागरिकांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौड, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मध्यप्रदेश राज्यातील प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क करून नियोजन केले. त्यानुसार सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करून, प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून मास्क देण्यात आले. तसेच विशेष रेल्वे निर्जंतुकीकरण करून प्रवाशांना खाण्याचे पॅकेट्स देण्यात आले. रेल्वेमध्ये बसल्यानंतर प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर घरी जाण्याचा आनंद दिसत होता.
यावेळी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त, कार्यालयातील उपायुक्त (महसूल) सिद्धराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार अमित सानप आदी उपस्थित होते.