रायगड - घराचा आधार असलेले वडिलांचे छत्र हरवल्यानंतर विधवा आई, मोठी बहीण, यांचा भार आपल्या खांद्यावर घेऊन तिने घर सावरले. अल्प शिक्षणामुळे धुणी भांडी, घरकाम असे पडेल ते काम तिने केले. गॅस सिलिंडर पोहोचविण्याचे काम करणाऱ्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तिने गॅस सिलिंडर घरोघरी पोहोचविण्याचे अवघड काम करून स्वतःसह आई व बहिणीचा उदरनिर्वाह चालवून स्वतःच्या पायावर उभी राहिली.
ही कहाणी आहे, रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे राहणाऱ्या कल्पना पांडुरंग हिलाल यांची. 12 वर्षांची असल्यापासून कल्पना हिने घर सावरायला सुरुवात केली. वडिलांचे छत्र हरपले त्यात तिचे बालपण सुद्धा हरवले. छोटी मोठी काम करत ती मोठी झाली.
वजन उचलणं हे सोपं काम नाही, हे समाजालाही मान्य आहे. म्हणूनच कल्पना हिलाल यांना सिलिंडर घेऊन गेल्यावर त्या घरातील गृहिणी त्यांची आपसूक चौकशी करून त्यांना चहा पाणी विचारते. कोणत्याही महिलेने त्यांच्या घरातील गॅसची टाकी संपली आहे, असा फोन करताच कल्पना ह्या तत्पर सेवा देतात. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्रियांबरोबरच आपल्या मनगटातील ताकदीने स्त्री कुठेच मागे नाही, हे दाखवून देणाऱ्या कल्पना हिलाल यांच्या या संघर्षाला व जिद्दीला सलाम!