रायगड - एकीकडे रणरणते ऊन तर दुसरीकडे पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट, असे विदारक चित्र सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. तसेच चित्र अलिबाग तालुक्यातील बोडणी कोळीवाड्यात पाहायला मिळत आहे. पाण्यासाठी लांबच्या लांब लागणारी हंड्यांची रांग ही येथील पाणी टंचाईची तीव्रता दाखवीत आहे. निवडणूक संपली आणि पाणी आटले, अशी ओरड पाणीटंचाईच्या बाबतीत सध्या कानावर पडत आहे.
मागील वर्षी पावसाने ऑगस्टपासूनच काढता पाय घेतला होता. सुरूवातीला झालेल्या पावसामुळे नदी, नाले, धरणे ओसंडून वाहत होते. मात्र, परतीच्या पावसाने ओढ दिल्याने पाणी योजनांवर त्याचा परिणाम झाला. अलिबाग तालुक्यातील बोडणी हे गाव समुद्रालगत आहे. चारशेहून अधिक उंबरठे असलेल्या या गावात पाण्याची मुबलक सुविधा नाही. वाढत्या वस्तीला पुरेल इतके पाणी दररोज उपलब्ध होत नसल्याने कोळी भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ही पाणीटंचाई यावर्षीच निर्माण झाली असे नाही. तर मागील अनेक वर्षे येथील ग्रामस्थ पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. अगदी जानेवारीपासूनच पाणीटंचाईला हळूहळू सुरूवात होते आणि ऐन एप्रिल-मेमध्ये तिची तीव्रता वाढते.
टाकी उशाला पण कोरड घशाला
बोडणी गावाच्या प्रवेशद्वारावरच भारत निर्माण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या २ मोठ्या पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. मागील वर्षी या टाक्या कार्यान्वित झाल्या. मात्र, गावकर्यांची तहान भागविण्यात असमर्थ ठरल्या. त्यामुळे टाकी उशाला पण कोरड घशाला, अशी येथील अवस्था आहे.
दोन हंड्यावर भागवावी लागते तहान
बोडणी गावात चारशेहून अधिक उंबरठे आहेत. दिवसेंदिवस घरांची आणि माणसांची संख्याही वाढत आहे. त्या तुलनेत मिळणारे पाणी हे अपुरे असल्याने ते कसे वापरावे, असा प्रश्न येथील ग्रामस्थ महिलांना भेडसावत आहे. एकावेळी दोन हंडे याप्रमाणे पाणी मिळते. पुन्हा नंबर येईल तेव्हा पाणी असेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे पाण्यासाठी दुसर्या गावात जावे लागते.
विकतचे घ्यावे लागते पाणी
रेवस पाणीपुरवठा अंतर्गत मिळणारे पाणी हे दररोज मिळेल, याची शाश्वती नाही. मागील वर्षीचा कमी झालेला पाऊस, जलवाहिनींची दुरूस्ती, एमआयडीसीकडून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा ही कारणे अपुर्या पाणीपुरवठ्याबाबत समोर येत आहेत. परिणामी गावकर्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर काही गावकरी विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवितात. निवडणूका जवळ आल्या की आश्वासनांनी गावकर्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न होतो. प्रत्यक्षात मात्र गावातील महिलांची पाण्यासाठीची वणवण काही थांबत नाही, असे विदारक चित्र बोडणी गावातच नव्हे तर अनेक ठिकाणी पहायला मिळते. त्यामुळे प्रशासनाने मुबलक पाणीपुरवठा कसा होईल, याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.