रायगड - शासनाने टाळेबंदीत हळूहळू शिथिलता आणली आहे. पर्यटनालाही परवानगी मिळाल्याने आता जिल्ह्यात पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. सात महिन्यांनंतर समुद्रकिनारी पर्यटक मोकळा श्वास घेण्यास दाखल झाले आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे.
कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने मार्च महिन्यापासून पर्यटनाला शासनाने बंदी घातली होती. धार्मिक, ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे यावर जाण्यास बंदी होती. त्यामुळे पर्यटनावर चालणारे व्यवसाय आर्थिक संकटात सापडले होते. पर्यटकांविना जिल्हाही सूनासूना झाला होता. आता शासनाने सर्वच क्षेत्र खुले करण्यास सुरुवात केली. त्यानुसार पर्यटनालाही परवानगी मिळाली आहे.
पर्यटन खुले झाल्यानंतर सात महिने घरातच अडकून पडलेले पर्यटक आता रायगडात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, नागाव, काशीद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन हे समुद्र किनारे पर्यटकांनी बहरण्यास सुरुवात झाली. पर्यटक येत असल्याने कॉटेज, रिसॉर्ट व्यावसायिकही आनंदित झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉटेज धारकांनीही आपले कॉटेज सॅनिटाईझकरून घेतले आहेत. पर्यटकही कोरोनाचे नियम पाळून समुद्रकिनारी आनंद लुटत आहेत.
पर्यटन सुरू झाल्याने सात महिन्यानंतर आम्ही मोकळा श्वास घेण्यास अलिबाग येथे आलो आहेत. कॉटेज धारकांनीही नियमानुसार आमचे तापमान, ऑक्सिजन चेक केले, मास्क लावण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे आम्हाला याठिकाणी सुरक्षित वाटत आहे, अशी प्रतिक्रिया पुणे येथून आलेल्या वसू कुटुंबाने दिली.