नवी मुंबई - शिवसेना पक्षाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चक्क पक्षाच्याच दुसऱ्या नगरसेवकाच्या कानशिलात लागवल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे हा संपूर्ण प्रकार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच घडला. यामुळे नवी मुंबईतल्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
नवी मुंबईतल्या वाशी सेक्टर 16 मध्ये टपाल व पासपोर्ट सेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्याला शिवसेनेचे खासदार राजन विचार आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही उपस्थीत होते. यावेळी नेरुळ मधील सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांनी जुईनगरमधील सेनेचे नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या कानशिलात लगावली. स्थायी समितीच्या वसुलीवरून हा वाद झाल्याचे समोर येत आहे.
स्थायी समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र, तरीही समितीची आर्थिक वसुली शिवसेनेचे दोन नगरसेवक करत होते. या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी जुईनगरचे नगरसेवक रंगनाथ औटी यांनी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांना मागच्या एका कामाच्या टक्केवारीविषयी विचारले. याचाच राग मनात धरत ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांनी मागचा पुढचा विचार न करता थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच रंगनाथ औटी यांच्या श्रीमुखात भडकावली.
ही घटना कशी घडली हे कळण्याआधीच तिथे उपस्थित असलेल्या एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली. एकनाथ शिंदे यांनी रंगनाथ औटी यांची समजूत काढल्याचे समजते आहे. पक्षाची बदनामी होऊ नये, यासाठी या प्रकरणाला मूठमाती देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.