रायगड - केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची अंमलबजावणी करण्यास पनवेलमध्ये सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत पनवेलमधील शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी तत्काळ करण्यासाठी पनवेलमधल्या ज्येष्ठ नागरिक संघ हॉलमध्ये नुकताच नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी आणि इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली.
भाजप सरकारने २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना २ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये अनुदान देण्याची योजना आणली. या योजनेला प्रधानमंत्री किसान सन्माननिधी असे नाव देण्यात आले. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांकडून माहिती मागवण्यासाठी पनवेलमध्ये सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पनवेलमधल्या ज्येष्ठ नागरिक संघ हॉलमध्ये सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. २ हेक्टर पेक्षा क्षेत्र कमी असलेल्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी गावनिहाय तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक या सर्वांना याद्या तयार करण्याचा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार दीपक आकडे यांनी अधिकाऱ्यांमार्फत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या. येत्या काही दिवसांत युद्ध पातळीवर माहिती भरण्याचे आदेश त्यांना दिले. त्यामुळे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांचे भंबेरी उडाली आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची माहिती संगणकीकृत विकसित असणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पनवेलमधल्या गावोगावी पोहोचून या माहिती देण्यात येणार आहे. या बैठकीत किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी कशी करावी, यासाठी महत्वाचे मार्गदर्शनही तहसीलदार दीपक आकडे यांनी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य तेवढ्या लवकर या योजनेसाठी तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार दीपक आकडे यांनी केले.