रायगड - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिक्षण, शेती, बँकिंग, लोन, इलेक्ट्रॉनिक याबाबत सर्व समावेशक अर्थसंकल्प मांडला आहे. मात्र, करोडपती उद्योगपती व मध्यमवर्गीय उद्योजकांमध्ये कराची तफावत ठेवली आहे. तर सोने, पेट्रोल, डिझेल यामध्ये दरवाढ केल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असल्याचे मत जिल्ह्यातील ज्येष्ठ कर सल्लागार संजय राऊत यांनी मांडले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ५०० कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या उद्योगांना २५ टक्के कर आकारणी केली आहे, तर भागीदार संस्था तसेच ज्याचे उत्पन्न १० लाख रुपयांच्यावर आहे अशा मध्यमवर्गीय उद्योगपतींना ३० टक्के कर आकारणी ठेवली आहे. त्यामुळे या कर आकारणीमध्ये तफावत ठेवली असून यामध्ये कुठे तरी समानता राखणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले. तसेच सोने, पेट्रोल, डिझेल यामध्ये वाढ केल्याने मध्यमवर्गीयांचे गणित बिघडणार असल्याचेही ते म्हणाले.
अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, शेती, महिलांसाठी सुविधा, घरकूलमध्ये कर सवलत, प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक वाहनावर सूट याची अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली आहे. त्याचबरोबर पाच लाखांवर कर नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, त्याबाबत कुठेतरी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. एकंदरीत अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असला तरी काही त्रुटी अर्थसंकल्पात असल्याचे राऊत म्हणाले.