रायगड - रायगड किल्ल्याकडे येणारा महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्ग हा टक्केवारीत अडकला असल्याने एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले छत्रपती यांनी केली. तसेच रोपवे चालकाच्या मनमानी कारभारावरही त्यांनी ताशेरे ओढले. रायगड किल्ल्याकडे येणारा महामार्ग हा हेरिटेज रस्ता व्हावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे यांनी रायगड किल्ला प्राधिकरण कामात चाललेल्या चालढकलपणाबाबत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच यापूर्वी झालेल्या रायगड प्राधिकरण बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती.
रायगड किल्ल्याकडे येणाऱ्या महाड रायगड किल्ला या राष्ट्रीय महामार्गाचे 24 किलोमीटर रस्त्याचे 147 कोटीचे काम एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. मात्र, या २ वर्ष उलटले तरी रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. मात्र, ठेकेदारामध्ये टक्केवारी वाटण्यात येत आहे. एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला भेटलेले काम हे अजून दोन ठेकेदारांना दिले असून त्यातून साडे सोळा टक्के टक्केवारी काढण्याचे काम सुरू केले आहे. याबाबतचे ठोस पुरावे असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. तसेच रस्त्याचे काम हे एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीनेच करावे अन्यथा या कंपनीला ब्लॅक लिस्ट करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
रायगड प्राधिकरण कामासाठी पुरातत्व विभाग कामांना मंजुरी देत नसताना रोपवे कंपनीला मात्र परवानगी दिली गेली. रायगड किल्ल्यावरील कामाबाबत केंद्रीय सचिव, जिल्हाधिकारी, पुरातत्व अधिकारी यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये किल्ल्याच्या कामांना त्वरित मंजुरी देण्याबाबत सांगितले. तरीही पुरातत्व विभाग हा रायगड प्राधिकरण कामांना मंजुरीसाठी अडवणूक करीत असल्याचा आरोपही राजेंनी पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे रोपवे कंपनीने केंद्रीय स्तरावर परवानगी घेतली असून रायगड प्राधिकरणाच्या परवानगीची गरज नसल्याची अरेरावी कंपनी मालकाने राजे समोर बोलून दाखवली आहे. त्यामुळे रोपवे मालकाच्या अरेरावी विरुद्ध नाराजी व्यक्त केली असून आम्हालाही रोपवेसाठी परवानगी द्या. त्यातून सर्व सामान्य शिवभक्तांना मोफत दरात व अल्प दरात किल्ल्यावर जाणे सोपे जाईल जेणेकरून रायगड रोपवे वाल्याची मनमानी संपुष्टात येईल, असेही ते म्हणाले.
रायगड किल्यावर पाणी, स्वछतागृह याची प्राथमिक सोयही करण्यात येणार असून वीज आणि म्युझिक सिस्टम चार महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, ठेकेदार आणि अधिकारी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे कामांना गती मिळत नसल्याची नाराजीही यावेळी छत्रपतींनी बोलून दाखवली. तसेच रायगड किल्ला संवर्धनासाठी 606 कोटी मंजूर असताना रस्त्यासाठी यामध्ये 147 कोटी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामामध्ये टक्केवारी काढायची असेल, तर प्राधिकरणातून ते काम वगळण्याची मागणी छत्रपतींनी केली आहे.