रायगड - जगभरात सध्या कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रायगड जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून जिल्ह्यातील चाकरमानी, परराज्यात अडकलेले नागरिक हे जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांना प्रशासनाने स्वतः च्या आणि जनतेच्या आरोग्य दृष्टीने होम क्वारंटाईन केले आहे. मात्र, त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये होम क्वारंटाईन व्यक्तीपासून आपल्याला कोरोनाची लागण होईल, अशी भीती निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रकार घडत आहेत. याबाबत प्रशासनाने आधी होम क्वारंटाईनबाबत जनतेत जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा समाजातील एकोपा तुटण्याची भीती या कोरोनामुळे निर्माण झाली आहे.
कोरोना विषाणू संक्रमण हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करून त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात. रिपोर्ट येईपर्यत त्यांना होम-क्वारंटाइन केले जाते. निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरही पुढे चौदा दिवस त्यांना क्वारंटाइन केले जाते. एखाद्या व्यक्तीला अथवा कुटुंबाला बाहेरून आला असेल तर होम-क्वारंटाइन केले जाते. कारण त्याला कोरोनाची लागण झाली असेल तर तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी होम क्वारंटाईन केले जाते. मात्र, होम क्वारंटाइन केले म्हणजे तो कोरोनाबाधित आहे, असा अर्थ होत नाही. त्याला लागण झाली असेल तरच तो व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न होते.
बाहेरून आलेल्या व्यक्तीची कुटुंबाची आरोग्य यंत्रणेकडून सर्व तपासणी करून त्याला होम क्वारंटाईन केले जाते. मात्र, हीच मोठी समस्या निर्माण होत असून आजुबाजूचे शेजारी, गावातील ग्रामस्थ अशा होम क्वारंटाईन व्यक्तीला, कुटुंबाला विरोध करीत आहेत. त्यामुळे वादाचे, भांडणाचे प्रकार घडण्यास सुरुवात झाली आहे. होम क्वारंटाईन म्हणजे काय याबाबत जनतेमध्ये शासन आणि प्रशासन स्तरावर जनजागृती होणे गरजेचे आहे. प्रत्येक जण आपल्या जीवाला घाबरत असतो. या कोरोनामुळे ज्यांना ही बाधा झाली नाही, मात्र बाहेरून आला असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने क्वारंटाइन आहे. हे ओझे त्याच्या डोक्यावर असताना आपलीच जिवाभावाची माणसं आपल्याला हटवण्यात आणि दूर सारण्यात सांगत असल्याने मानसिकता बदलत चालली आहे. त्यामुळे कोरोना संकट हे एकेदिवशी निघून जाईल मात्र होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती आणि कुटुंब ही समाजापासून दुरावणार नाहीत, याची काळजी घेणे ही गरजेचे आहे.
माझी बहिण आणि भाचा आणि मी असे तीनजण बोरिवली येथून गावी आलो असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमची आरोग्य तपासणीही केली आहे. आम्ही सर्व जण गावातील शाळेत होम क्वारंटाईन असून शासन आणि प्रशासन यांनी आखून दिलेले नियम पाळत आहे. मात्र, तरीही ग्रामस्थ हे आम्हाला नाहक त्रास देत आहेत. याबाबत प्रशासनाने लक्ष द्यावे ही विनंती होम क्वारंटाईन व्यक्तीने केली आहे.