रायगड - जिल्ह्यात दरवर्षी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडत असतो. पावसाचे प्रमाण चांगले असताना जिल्ह्यात पाणी साठवणूक योग्य पद्धतीने होत नसल्याने दरवर्षी डिसेंबर महिना सुरू झाला की पाणीटंचाई समस्या डोके वर काढत असते. पाणीटंचाई समस्या मुळासकट सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जल जीवन योजनेअंतर्गत मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचा मनोदय असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी म्हटले आहे.
पाण्याचे योग्य नियोजन नाही
रायगड जिल्हा परिषदअंतर्गत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विविध पाणी योजना राबविल्या जात आहेत. मात्र योजना गावागावात पोहचल्या जात असताना योग्य नियोजन ग्रामपंचायत पातळीवरून होत नसल्याने पाणी समस्या सुटत नाही. त्यातच वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण यामुळे पाणी पुरवठा करणे कठीण होऊ लागले आहे. अनेक गावे आजही एमआयडीसी पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे नैसर्गिक असलेल्या विहिरी, बोरीग, बंधारे याचा वापर नागरिकांकडून कमी होऊ लागला आहे.
नैसर्गिक जलस्त्रोत पुनर्जीवित करणे गरजेचे
जिल्ह्यात दरवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र जमिनीत पाणी हवे तसे मुरत नाही. त्याचबरोबर पावसामुळे तयार झालेले नैसर्गिक धबधबे यावरून पडणाऱ्या पाण्याची साठवणूक केली जात नाही. त्यामुळे लाखो लिटर पाणी हे वाया जात आहे. त्यामुळे असे नैसर्गिक असलेल्या पाण्याचे स्त्रोत याचा योग्य उपयोग करून पाणी साठवणूक कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिक जलस्रोताद्वारे बारमाही पाणी साठवणूक करणे गरजेचे आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
प्रत्येक नागरिकाला 55 लिटर शुद्ध पाणी देणार
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी योजना, जलस्वराज्य योजने अंतर्गत गावागावात केलेल्या योजना योग्य पद्धतीने सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या योजना बंद झाल्या आहेत त्या पुनर्जीवित केल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही त्याठिकाणी ती केली जाणार आहे. गावातील नैसर्गिक स्रोत पुन्हा पुनर्जीवित केले जाणार आहेत. नागरिकांच्या प्रत्येक घरात नळ देऊन त्याद्वारे पाणी दिले जाणार आहे. तसेच नागरिकांनी वेळेत पाणी पट्टी भरणेही महत्वाचे आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी सोबत नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यातील शाळा, अंगणवड्यामध्ये जोडली कनेक्शन
जिल्हा परिषदेच्या असलेल्या 3200 शाळा आणि 3225 अंगणवाड्यामध्ये पाण्याची सुविधा कशी आहे, याबाबत सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये 3200 शाळांपैकी 443 शाळांमध्ये नळ पाणी कनेक्शन नसल्याचे समोर आले. जलजीवन योजनेंतर्गत 443 शाळांपैकी 200 शाळांना त्वरित नळ पाणी कनेक्शन जोडणी केली आहे, तर उर्वरित शाळांमध्येही लवकरच जोडणी करणार आहेत. 3225 अंगणवाड्या पैकी 1500 अंगणवाड्याना पाणी कनेक्शन नसल्याचे सर्वेत समोर आले. त्यानुसार 725 अंगणवाड्याना नळ पाणी कनेक्शन जोडणी करण्यात आली आहे. तर उर्वरित अंगणवाड्याची नळ जोडणी लवकरच केली जाणार आहे.
कनेक्शन अधिकृत करा, अन्यथा...
जिल्ह्यात ज्या नागरिकांनी अनधिकृत नळ जोडणी केली आहे, त्यांनी जिल्हा परिषदेकडे अधिकृत नळजोडणी करण्याबाबत अर्ज करा. त्यानंतर असलेला दंड भरून नळ जोडणी अधिकृत करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. जे असे करणार नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून नळ कनेक्शन तोडले जाईल, असेही पाटील यांनी म्हटले आहे.