रायगड - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर महाड न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती. ही सुनावणी नुकतीच आटोपली आहे. न्यायालयाने राणेंना 15 हजार रुपयांचे वैयक्तिक जातमुचलक भरण्यासाठी जामीन मंजूर केला आहे. दरम्यान जामीन मंजूर करताना न्यायालयाने राणेंना काही अटी घातल्या आहेत. त्यांना 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी उपस्थित राहावे आणि भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही असे न्यायालयाने सांगितल्याचे नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितले आहे.
जामीनानंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
महाड दंडाधिकारी न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर केला आहे. आम्ही आमची जन आशीर्वाद यात्रा परवा सुरू करू, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
'या' घडल्या घडामोडी
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मंगळवारी दुपारी रत्नागिरीमधून अटक करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य राणेंच्या चांगलेच अंगलट आल्याचे पहायला मिळाले. रत्नागिरी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली होती. या अटकेपूर्वी आणि नंतर राज्यभरात विविध घडामोडी पहायला मिळाल्या. राणेंच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाकडून जोरदार विरोधही करण्यात आला. तर दुसरीकडे शिवसेनेकडून राणेंविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आले. राणे विरुद्ध शिवसेना असे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळाले. तर नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर दगडफेक केल्याचेही पहायला मिळाले.
हेही वाचा - जाणून घ्या, नारायण राणे संदर्भात आज दिवसभरात नेमके काय घडले